जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या
ऑनलाईन बदली नवीन अपडेट
टप्पा क्रमांक सहा रद्द होणार नाही !
ग्रामविकास विभाग व अभ्यासगट
आजचे बदली नवीन अपडेट
शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संदर्भातील टप्पा क्र.६ बाबत आयोजित करण्यात आलेली बैठक.
उपरोक्त विषयाबाबत मा. मंत्री, ग्राम विकास, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली, दालन क्र.१२३, पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे गुरुवार, दिनांक १६.०३.२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदरहू बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठविण्यात येत आहे..
#ग्रामविकास
#Teacher Online Transfer
#शिक्षक बदली
विषयांकित प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे तथा अध्यक्ष अभ्यासगट, (जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा प्राथमिक शिक्षक बदली) यांनी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदलीसंदर्भात माहिती सर्व सन्माननीय सदस्यांना दिली.
त्याअनुषंगाने बैठकीत विस्तृत चर्चा झाली.
बैठकीत चर्चेचा मुद्दे नुसार घेतलेला निर्णय सविस्तर वाचा
मुद्दा क्रमांक १
१.सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या परंतु एका शाळेत सलग ५ वर्षे सेवा पूर्ण झालेली नाही, अशा शिक्षकांना बदलीच्या सहाव्या टप्प्यातून सूट देण्यात यावी
बैठकीत घेतलेला निर्णय
शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील मुद्दा क्र.१.१० नुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची १० वर्षे सेवा पुर्ण झालेली आहे, अशा शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.
तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागा सेवाज्येष्ठता विचारात घेवून सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे सेवा पुर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव्य ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल, अशी तरतूद आहे. काही शिक्षक नियुक्तीच्या दिनांकापासून / दिर्घ काळ सर्वसाधारण क्षेत्रातच कार्यरत आहेत,
त्यामुळे अवघड क्षेत्रात सेवा देणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये बदलीने येण्यासाठी रिक्त पदे उपलब्ध होत नाहीत,
ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणली.
यापैकी जे शिक्षक संवर्ग १ मधील आहेत, तसेच ज्यांचे वय ५३ वर्षे पूर्ण आहे, अशा शिक्षकांना सदर प्रक्रियेमधून होकार/ नकार देण्याची सूट | देण्यात आलेली आहे.
त्यामूळे अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीसाठी पुरेशी संधी उपलब्ध करुन देण्याकरिता सर्वसाधारण क्षेत्रात किमान १० वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांचा या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे अशा शिक्षकांना सूट देता येणार नाही.
सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयास सहमती दर्शविली.
मुद्दा क्रमांक २
२ .सहाव्या टप्प्यामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांच्या वयोमर्यादेबाबतचा आधारभूत दिनांक ३० जून २०२२ ऐवजी २०२३ मधील धरण्यात यावी.
बैठकीत घेतलेला निर्णय
शासन निर्णय दि. ०४.०५.२०२२ अन्वये सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१.०५.२०२२ ऐवजी दिनांक ३०.०६.२०२२ पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार सर्व शिक्षकांची माहिती ऑनलाईन बदली प्रणालीवर भरण्यात आलेली आहे.
जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरु असल्याने ६ व्या टप्प्यामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांच्या वयोमर्यादेबाबतच्या आधारभूत दिनांकांमध्ये बदल करता येणार नाही.
सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयास सहमती दर्शविली.
मुद्दा क्रमांक ३
३.जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या ६ व्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील दुर्गम भागातील शाळांमधील रिक्त जागांचा समावेश असल्याने अशा ठिकाणी महिला शिक्षकांची बदली करण्यात येवू नये.
बैठकीत घेतलेला निर्णय
अन्य संवर्गातील महिला कर्मचारी जसे | तलाठी, ग्रामसेविका, कृषि सहायक यांची अवघड क्षेत्रात नियुक्ती करणेवर प्रतिबंध नाही.
त्यामुळे समान न्यायाने महिला शिक्षिका ची नियुक्ती अवघड क्षेत्रात करण्यावर प्रतिबंध लावता येणार नाही.
कोणतेही गाव / क्षेत्र महिला शिक्षकांच्या नियुक्तीस प्रतिकूल घोषित करणे हे घटनेच्या कलम १४ शी विसंगत आहे अशी अभ्यास गटाची शिफारस असल्याने तसेच महिला शिक्षिकांची अवघड क्षेत्रातील नियुक्ती तेथील विद्यार्थिनिंना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार असल्याने अवघड ठिकाणी झालेल्या/ होणाऱ्या महिला शिक्षकांच्या बदल्या रद्द करणे योग्य होणार नाही,
ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणली.
त्यामुळे अशा महिला शिक्षकांना सूट देता येणार नाही. सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयास सहमती दर्शविली.
मुद्दा क्रमांक ४
४. शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संदर्भातील टप्पा क्र ६ स्थगित करता येईल का?
बैठकीत घेतलेला निर्णय
१. दीर्घकाळ सर्वसाधारण क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात पदस्थापित केल्याने सर्वसाधारण क्षेत्रात जागा रिक्त होतील. अशा जागांवर पुढील बदली प्रक्रियेत संवर्ग एक, दोन तसेच अवघड क्षेत्रातील लोकांना संधी उपलब्ध होईल.
२. या टप्प्याबाबतच्या तरतूदी Right to Education व PESA कायद्याशी सुसंगत असल्याने सदर टप्पा राबविणे आवश्यक आहे.
३. आतापर्यंत पार पडलेली जिल्हांतर्गत भरती प्रक्रिया ही पुर्णतः शासन निर्णय तरतुदीनुसार ऑनलाईन पारदर्शक पद्धतीने राबविली आहे.
सदर राऊंड स्थगित करायचा झाल्यास शासन निर्णयातील तरतुदीविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल.
असे केल्यास आतापर्यंत बदली प्रक्रियेतून गेलेल्या इतर संवर्गांकडूनही अशाप्रकारची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सदर राऊंड राबविण्याची कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणली.
सर्व सन्माननीय सदस्यांनी या निर्णयास सहमती दर्शविली.
उपरोक्त प्रमाणे चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांत सहावा टप्पा विहीत वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात यावा, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
उपसचिव (ग्रामविकास विभाग) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठक संपन्न झाली


आपली प्रतिक्रिया व सूचना