Motivation Story
For Teacher
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात परितेवाडी आहे. तिथल्या कदम वस्तीवरची वस्तीशाळा. सदर शाळेवर 2009 ला रणजितसिंह डिसले शिक्षक म्हणून रुजू झाले. इंजिनिअरिंगचा तो Droupout Student होता. वडिलांनी सांगितलं D.Ed कर, शिक्षक हो. रणजित D.Ed झाला आणि शिक्षकही. खेड्यातल्या त्या शिक्षकाने शिक्षण क्षेत्रातलं नोबेल प्राईज मानलं जाणारं'Global Teacher Prize 2020' जिंकलं आहे. थक्क करणारी विलक्षण ही घटना आहे. असं काय केलं त्यांनी की जगातल्या 140 देशातील 12 हजार शिक्षकांतून त्यांची निवड झाली?
देशभरातील अनेक शिक्षक खेड्यापाड्यात, वडीवस्तीवर असलेल्या शाळांतील विद्यार्थी घडवताना मेहनतीने, निष्ठेने लोकांनी कितीही नावं ठेवू देत शिक्षक प्रामाणिकपणे पवित्र कार्य करताहेत. म्हणूनच देश उभा राहतोय. पण डिसले गुरुजींनी वेगळं काय केलं?
अलीकडेच तंत्रस्नेही शिक्षक हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आहे. तो तेवढासा बरोबर नाही. शिक्षक हा तंत्रयुक्त पण विद्यार्थी स्नेही असायला हवा. डिसले गुरुजी यांनी तेच केलं. आपल्या खेड्यातल्या मुलांसाठी त्यांनी देशांच्या सीमा खुल्या केल्या. जगभरच्या मुलांशी परितेवाडीची ती मुलं बोलत होती. पण तंत्रज्ञानाचा हा उपयोग त्यांना तिथेच स्वस्थ बसू देईना. हातात असलेल्या मोबाईलचा, लॅपटॉपचा उपयोग मुलांसाठी का करता येणार नाही? शिकवणं म्हणजे पाठ्यपुस्तकातले धडे शिकवणं नाही. तो सगळा धडा जिवंत करता आला तर? ऑडिओ, व्हिडीओमधून नाट्य उभं करता आलं तर? त्या धड्यातले संदर्भ शिक्षकांना सहज उपलब्ध का होऊ नयेत? पुस्तकात धड्याच्या खाली संदर्भ दिलेले जरूर असतात पण खेड्यातले शिक्षक ते शोधून कुठून काढणार? मुलांपर्यंत ते कसे पोचवणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डिसले गुरुजींनी एका Click वर शोधली. बाजारातला QR Code किंवा परीक्षेत वापरला जाणारा BarCode आपल्याला आता काही नवा राहिलेला नाही. गुरुजींनी नवीन एवढंच केलं की अख्खं पाठ्यपुस्तक त्यांनी QR Coded केलं. आपल्या शाळेत पहिल्यांदा प्रयोग केला. मग जिल्हा परिषदेत दाखवला. तेथून गुरुजी थेट बालभारतीत जाऊन पोचले. श्रीमती धन्वंतरी हर्डीकर या बालभारतीतल्या संवेदनशील अधिकारी बाईंनी त्याचं महत्त्व ओळखलं. आणि प्रोत्साहन दिलं. डिसले गुरुजींच्या पाठपुराव्यामुळे बालभारतीने म्हणजे महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये सगळी पुस्तकं QR Coded करायचं ठरवलं. पुढे देशभरातल्या अनेक राज्यांनी तोच कित्ता गिरवला.
त्या एका QR Code ने अख्खा धडा जिवंत होऊ लागला. तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही प्रेरणा विद्यार्थी स्नेहाशिवाय, शिक्षणाबद्दलच्या तळमळीशिवाय आणि अध्यापनाच्या सर्जनशिलतेशिवाय मिळूच शकत नाही. या तिन्ही गोष्टी डिसले गुरुजींकडे होत्या. म्हणून त्यांच्या आग्रहाने QR Code चा वापर देशभरातल्या सगळ्या पाठ्यपुस्तकात सार्वत्रिक झाला. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनासाठी आणि अध्ययनासाठी सुद्धा होऊ शकतो हे त्यांना सुचलं. सुचल्यानंतर प्रयत्नपूर्वक त्यांनी ते अमलात आणलं. आणि आपल्या शाळेपुरतं मर्यादित न ठेवता देशभरच्या पाठ्यपुस्तकांना त्यांनी एका अर्थाने ग्लोबल केलं.
Internet आणि QR Code या दोन तंत्राच्या आधारावर वाडी, वस्तीवरच्या शाळा आणि तिथली मुलं ग्लोबल होऊ शकली याचं अप्रूप Varkey Foundation आणि UNESCO ला वाटलं. कोविडच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे QR Code चं महत्त्व अधिक अधोरेखित झालं. गेल्या वर्षी लोकमतच्या विजयबाबू आणि राजेंद्र दर्डा यांनी डिसले गुरुजींची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला होता. Microsoft ने सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. आता तर थेट जागतिक स्तरावर त्यांची मुद्रा उमटली.
डिसले गुरुजींचं मोठेपण इथेच थांबत नाही. हा शिक्षक जितका सर्जनशील आहे तितकाच संवेदनशील आहे. आणि विनम्रही. म्हणून पुरस्कार स्वीकारताना ही काही आपल्या एकट्याचीच निर्मिती आहे, असं न मानता त्यांनी आपल्या पुरस्काराची अर्धी रक्कम त्यांचे सहस्पर्धक असलेल्या 9 जणांमध्ये शेअर केली. वाटून टाकली. आणि उरलेली अर्धी रक्कम शिक्षणाच्या Innovative Lab साठी वापराचं ठरवलंय. 7 कोटींचं बक्षिस आहे साहेब. पण घरात नाही नेलं. पुन्हा जे कंकण हाती बांधलेलं आहे, त्याच्याशी जोडलं. या पुरस्काराने गुरुजी मोठे झाले खरे, पण आपली बक्षिसाची रक्कम सहस्पर्धकांमध्ये वाटायची आणि उरलेली रक्कम पुन्हा नव्या शैक्षणिक संशोधनासाठी वापरण्याचा निर्धार करायचा, यातून ते आणखीन मोठे झाले.
डिसले गुरुजींनी केवळ तंत्रज्ञानाला असलेल्या बाजारू मर्यादा नाही तोडल्या, तर आपल्या मुलांना बॉर्डर क्रॉस करून जगभरातल्या मुलांशी जोडलं. त्यांना आधुनिकतेची, नवतेची दारं खुली केली. आणि केवळ परितेवाडीच्या मुलांसाठी नाही देशभरातल्या, प्रत्येक शाळेतल्या, प्रत्येक मुलाच्या ज्याच्या पाठ्यपुस्तकात QR Code आता आहे त्या प्रत्येकाचा दरवाजा त्यांनी खोलला आहे. शिक्षणाला कोणतीच बंधनं नकोत, कोणत्याच सरहद्दी नकोत हे त्यांनी सांगितलं. आपल्या देशात माहोल तर असा आहे की प्रत्येकजण स्वतःलाच एक कुंपण घालून घेत आहे. केशवसूत शिक्षक होते. ते म्हणत, 'मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे.' धर्म, जाती, प्रांत भेदाच्या भिंती केवळ आपल्याच देशात घातल्या जात आहेत असं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे हरलेत त्यांना मोठी भिंत बांधायची होती, अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना हरवलं. डिसले गुरुजी शिक्षणाला घातलेल्या भिंतीही तोडू मागत आहेत, याचं आधी कौतुक केलं पाहिजे. ब्रिटिशांनी संस्कृत पाठशाळा सुरू केल्या, तेव्हा राजाराममोहन रॉय यांनी आधुनिक शिक्षणाची मागणी केली होती. डिसले गुरुजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या वस्तीवरच्या मुलांसाठी करून देत आहेत. महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारं सगळ्यांना मोकळी केली त्यालाही 170 वर्ष होऊन गेली. आता कमी पटाच्या शाळा बंद करण्याची तरतूद नवीन शिक्षण धोरणात (NEP 2020) आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठल्या हायफाय शाळेतल्या शिक्षकाचा नाही गौरव झाला. शिक्षणापासून आजही वंचित असलेल्या वर्गातली, गावातली मुलं जिथे शिकतात तिथल्या शिक्षकाचा जागतिक सन्मान झाला ही घटना आपल्या सगळ्यांनाच मोठी बळ देणारी आहे.
रणजितसिंह डिसले गुरुजी, खरंच ग्रेट. तुम्हाला सलाम! आणि तुमच्या सारखेच प्रयत्न करणारे देशातले आणि जगभरचे जे जे शिक्षक आहेत, त्यांनाही सलाम!


आपली प्रतिक्रिया व सूचना